सांगली जिल्ह्यातील चांदोली पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, डोंगरमाथ्यावरून चांदोली धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी चारही वक्राकार दरवाजे उघडून 11,900 क्युसेक्स पाणी आणि वीज निर्मितीसाठी 1,630 क्युसेक्स असे एकूण 13,530 क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठच्या भात व ऊस पिकामध्ये शिरले आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोली पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत मागील २४ तासात ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून आजअखेर एकूण १,९०१ मिमी पाऊस पडल्याची माहिती वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्राने दिली आहे.
दरम्यान, वारणा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाणी शेतांमध्ये घुसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याशिवाय सांगलीतील कृष्णा नदीची पातळीही १९ फुटांवर पोहोचली असून गेल्या दोन दिवसांपासून त्यात सातत्यानं वाढ होत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना पुराच्या संभाव्य धोक्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments