कुरुंदवाड येथील मजरेवाडी रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २६, रा. कुरुंदवाड) या युवकावर अज्ञात तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने तीन विशेष पोलिस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय चव्हाण आणि अज्ञात तिघा आरोपी यांच्यात एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. त्याच वादाचे पर्यवसान हिंसक प्रकारात झाले आणि त्या तिघा संशयितांनी अक्षयवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेनंतर अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय चव्हाण याची काहीशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, या हत्येमागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत.
कुरुंदवाड शहरात ही दुसऱ्यांदा घडलेली अशा प्रकारची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments