सांगली जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावून पळणाऱ्या चेन स्नॅचिंग चोरट्यांना अखेर पोलिसांनी गजाआड केलं आहे. मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन सावंत यांनी विशेष पथक तयार करून ही कारवाई केली.
या पथकातील पोहेकॉ. प्रकाश पाटील व पोहेकॉ. सागर टिंगरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माधवनगरमधील जुना जकात नाका परिसरात दोन इसम चोरीचे सोने विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींची नावे प्रविण भगवान गायकवाड (२८, रा. मळणगाव, ता. तासगाव) व रोहित अदिकराव सपकाळ (२३, रा. गौरगाव, ता. तासगाव) अशी असल्याचे समोर आले. प्रविणच्या अंगझडतीत त्याच्या डाव्या खिशातून एक सोन्याची चैन सापडली. अधिक चौकशीत त्यांनी कबुली दिली की, त्यांनी वखचौडे गावाजवळ फिरायला आलेल्या महिलेच्या गळ्यातून ती चैन हिसकावली होती.
पोलिसांनी मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल पंचनाम्याने जप्त केली असून आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या संपूर्ण कारवाईमुळे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे.
0 Comments