कुपवाड एमआयडीसी परिसरात पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल (६ ऑगस्ट) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली. मयूर सचिन साठे (वय २५, रा. सोनी) याचा खून त्याचा वर्गमित्र प्रताप चव्हाण (वय २५, रा. सोनी) याने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीवरून, दोघांमध्ये काही दिवसांपासून आर्थिक वाद सुरू होता. काल रात्री एमआयडीसी हद्दीत झालेल्या वादानंतर प्रताप चव्हाणने रागाच्या भरात मयूर साठे याच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्याचा खून केला. घटनेनंतर सकाळी प्रताप चव्हाणने स्वतःहून कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात हजेरी लावली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती.
कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.
0 Comments