तिरोडा तालुक्यातील *अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळां सरांडी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला. शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपल्या पालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगातही पोस्टकार्डच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवल्या.
डिजिटल संदेश आणि सोशल मीडियाच्या युगात, हस्ताक्षरात लिहिलेल्या पोस्टकार्डला एक विशेष महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा लिहून पोस्टकार्ड पाठवता, तेव्हा त्यामध्ये एक वेगळीच आपुलकी जाणवते. यामुळे शुभेच्छांना एक वैयक्तिक आणि भावनिक स्पर्श मिळाला. ही गोष्ट फक्त एका क्षणाची नसून, ती एक अमूल्य आठवण बनून राहते.
या पोस्टकार्ड्सवर भारताची राष्ट्रीय चिन्हे, ऐतिहासिक ठिकाणे किंवा स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे छापलेली आहेत, ज्यामुळे त्यांना अधिक आकर्षक रूप मिळाले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना अधिक जागृत झाली आणि त्यांना आपल्या देशाच्या इतिहासाची जाणीव झाली. पालकांसाठीही हे पोस्टकार्ड एक अविस्मरणीय भेट ठरली, कारण त्यांना आपल्या मुलींच्या हाताने लिहिलेल्या शुभेच्छा मिळाल्या. या पोस्टकार्ड्समध्ये विद्यार्थिनींनी ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांसह स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
हा उपक्रम राबविण्यासाठी प्रीती घरडे यांनी अथक प्रयत्न केले. तसेच उमेश ढवळे, प्रवीण कौंडलकर, मनोज कामडी सत्वशीला उंदिरवाडे, दीपक बनकर सहाय्यक शिक्षक शिक्षकेत्तर, बाह्यस्त्रोत कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. आपणास स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments