दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी एरंडोली गावात धक्कादायक प्रकार घडला. मुल होण्याचे औषध देतो असे सांगून दाम्पत्याला फसवून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला सांगली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे.
फिर्यादी दाम्पत्याला "देवाऱ्यात बसून २० मिनिटे हलायचे नाही, कुणाशी बोलायचे नाही" असा विश्वास बसवून आरोपीने दागिने पितळी हंड्यात ठेवायला लावले. तो "मंदिरात जाऊन येतो" असे सांगून चारचाकी वाहनासह पसार झाला. आरोपी परत न आल्याने दाम्पत्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. पंकज पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला.
दरम्यान, पोहेकॉ. सागर लवटे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सांगली शहरातील माधवनगर परिसरात सापळा रचण्यात आला. जुना जकात नाका येथे संशयित चारचाकी वाहन अडवून चालकास ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नागेश राजू निकम (वय ३६, रा. निमशिरगाव, ता. इंदापुर, जि. पुणे) असे सांगितले.
वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता डिकीत पितळी हंडा व गिअरजवळ कपड्यात गुंडाळलेले सोन्या-चांदीचे दागिने मिळाले. चौकशीत आरोपीने कबुली दिली की, हे दागिने त्याने एरंडोली गावातील दाम्पत्याची फसवणूक करून चोरी केले आहेत.
आरोपीकडून दागिने, पितळी हंडा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून आरोपीला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments