विदर्भाची मध्य काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा गावातील संत श्री लहरीबाबा आश्रमाचे आजीवन अध्यक्ष गोपालबाबा खरकाटे यांचे १४ एप्रिल २०२५ रोजी दीर्घ आजाराने नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर १५ एप्रिल रोजी त्यांच्या जन्मगाव कामठा येथील शेतात हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी, गोपालबाबा यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी संत श्री लहरीबाबा आश्रमात ठेवण्यात आले होते. त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
या शोकदिवशी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, संजय धोटे, मधुकर कुकळे, हिना कावरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या वर्षा पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली.
गोपालबाबा खरकाटे हे संत श्री लहरीबाबा यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लहरीबाबांच्या निधनानंतर त्यांनी कामठा आश्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले होते आणि आश्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत अध्यात्मिक विचार पोहोचविण्याचे कार्य सातत्याने केले.
आता आश्रमाच्या पीठाधीशपदाची जबाबदारी तुकड्याबाबा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लहरी भक्तांनी गोपालबाबांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि "जय लहरी, जय मानव"च्या घोषात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक पहा
0 Comments