मुदखेड तालुक्यातील चेनापुर-नागेली ते मुगट स्टेशन २१ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी १० कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु रस्त्याच्या डागडुगीचे काम अत्यंत दर्जाहीन केले जात असल्याचा टाहो नागरिकांनी फोडला आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याच्या बोगस कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे हात मलीन असून टक्केवारीच्या खेळात गुत्तेदार बोगस रस्ते निर्माण करून विकासाला खिळ घालत असल्याने याकडे खा. अशोक चव्हाण यांनी लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया उत्तमराव लोमटे बारडकर यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या सर्वच रस्त्यांचे बेहाल असून गुत्तेदार मालामाल होत असल्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी बारड ते नागेली या रस्त्याचे काम मागील वर्षीच करण्यात आले होते. नागेली व बारडमध्ये अनेक पुढारी असूनही रस्त्याचे काम बोगस व तातडीचे खड्डे कसे? असा संतप्त सवाल नागेलीवासियांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात दर्जेदार रस्ता करण्याचे आश्वासन खा. अशोक चव्हाण यांनी दिले होते. परंतु आता रस्त्यासाठी आता १० कोटी रुपयांचा भरीव निधी येऊनही रस्ता दर्जेदार का होत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चेनापूर - नागेली - बारड - मुगट स्टेशन - आमदुरा - रोही पिंपळगाव - पिंपळकोठा - सिंधी पर्यंत दर्जेदार नूतनीकरणासाठी निधी प्राप्त झाला आहे.
बारड ते नागेली रस्त्याच्या कामात गिट्टीचा तसेच डांबराचा अत्यंत कमी वापर असून फुफुर्ड्यावरच गिट्टी अंथरली जात आहे. त्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद केले होते. यानंतर संतप्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कामाची तक्रार केली आहे.
विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची प्रतिक्रिया वाचणे
सध्या गुत्तेदारीचा व्यवसाय तेजीत आहे. नेतेही दुर्दैवाने कार्यकर्त्यांनाच कामाचे कंत्राट देत आहेत. यामुळे कामाचा दर्जा घसरत चालला असून टक्केवारी जोमात आहे. वाढली आहे. अधिकारीही बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांचेही खड्ड्यात हात मलीन असल्याची चर्चा आहे.
-उत्तमराव लोमटे बारडकर
- भाजप कार्यकर्ते.
रस्त्याच्या कामात डांबर अत्यल्प आहे. रस्ता साफ न करता फुफुर्ड्यावर गिट्टी अंथरली जात आहे. त्यामुळे सरकारकडे डांबर नाहीये का? हाच प्रश्न उपस्थित होतो.
-कैलास आमदुरकर
भाजपा माजी तालुकाध्यक्ष ओ. बी. सी. सेल
या बोगस रस्त्याला केवळ गुत्तेदार कारणीभूत नसून नेतेही कारणीभूत आहेत. निवडणुका हायजॅक करण्यासाठी असे बोगस रस्ते करावे लागतात.
- भगवानराव राठोड
युवा कार्यकर्ता, गोब्रा तांडा.
राज्यात सध्या निधी हा विकासासाठी नसून राजकीय लोकांच्या पोटापाण्याचा विषय बनला आहे. केवळ विकासाला खिळ बसली नसून राजकीय विचारांनाच खिळ बसली आहे.
भगवान पवार निवघेकर
सचिव मुतखेड तालुका काँग्रेस
0 Comments